गुन्हेजळगांवराजकीयशासकीय

गिरणा पात्रात मजुराचा मृत्यू, घातपात की खून?, प्रकरण दाबल्याची चर्चा

खान्देश टाइम्स न्यूज | २८ जुलै २०२३ | धरणगाव तालुक्यातील वैजनाथ, टाकरखेडा परिसरात गिरणा नदीपात्राच्या किनाऱ्यावर ट्रॅक्टरमध्ये रेती भरत असताना एका तरुणाचा गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. दरम्यान, मजुराचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू की त्याला ट्रॅक्टर खाली चिरडण्यात आले असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, हे प्रकरण दाबले गेले असल्याबाबत ग्रामस्थांचे म्हणणे असून पोलीस प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. तसेच याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनाही माहिती मिळाली असून त्यांनी घटनेची विचारपूस सुरु केल्याचे समजते.

गिरणा नदीपात्रात बंदी असतानाही अनेक जण दिवसरात्र वाळू चोरी करीत असतात. गुरुवारी पहाटे ६ ते ७ वाजेच्या सुमारास वैजनाथ परिसरात गिरणा नदीच्या किनाऱ्यावर ट्रॅक्टरमध्ये वाळू भरत असताना एका तरुण मजुराच्या अंगावर बाजूच्या टेकडीच्या मातीचा ढिगारा त्याच्या अंगावर पडला. त्याखाली तो दबला जाऊन जागीच मयत झाला, अशी माहिती अगोदर समोर आली होती. तर त्या मजुराला वादातून ट्रॅक्टर खाली चिरडण्यात आल्याची देखील चर्चा होती. मात्र प्रकरणाची वाच्यता होऊ नये म्हणून संबंधित घटनास्थळावरील संशयित लोकांनी तत्काळ त्याला घेऊन त्याच्या घेऊन जात अंत्यसंस्कार उरकल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती पोलिसांना देखील मिळाली होती तसेच याबाबत फोन देखील खणखणले होते मात्र मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झालेला नाही. घटनास्थळी गर्दी देखील जमली होती मात्र वाळू माफियांनी तत्काळ प्रकरण दाबल्याची माहिती मिळत आहे.

घडलेल्या प्रकारची गुरुवारी दिवसभर चर्चा होती मात्र रात्री जळगावातील गोळीबार प्रकरणाने ती चर्चा शांत झाली. शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांना याची कुणकुण लागताच, धानोरा, वैजनाथ, टाकरखेडा, पाळधी, बांभोरी, कढोली गावांत पुन्हा याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, धरणगाव पोलीस स्टेशनचे पो.नि. उद्धव ढमाले व पाळधी पोलीस स्टेशनचे सपोनि प्रमोद कठोरे हे आज शुक्रवारी संध्याकाळी या घटनेची सत्यता तपासण्यासाठी नदीपात्रात व किनाऱ्याजवळ घटनास्थळ शोधण्यासाठी गेले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button