
मागासवर्गीय समाजासाठी आलेला निधी हडप; ग्रामपंचायतीवर संतप्त ग्रामस्थांचा आरोप
सुभाष धांडे | जळगाव
मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी ग्रामपंचायतीने मागासवर्गीय समाजासाठी आलेला भांडी खरेदीचा लाखो रुपयांचा निधी हडप केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत संतप्त समाजबांधवांनी ग्रामपंचायतीला लेखी निवेदन देत तात्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे.
पंधरावा वित्त आयोग 2020-21 अंतर्गत मागासवर्गीय समाजासाठी सामूहिक स्वयंपाकासाठी लागणारी भांडी खरेदीसाठी 1,49,000 रुपये तसेच 2021-22 मध्ये 75,000 रुपये असा एकूण 2,24,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, हा निधी प्रत्यक्षात कोणतीही खरेदी न करता ग्रामपंचायतीने परस्पर काढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामपंचायतीकडून निधी हडप केल्याचे समजताच प्रमोद गायकवाड, शिवाजी वानखेडे यांच्यासह समाजबांधवांनी ग्रामपंचायतीकडे धाव घेतली. मात्र, सरपंच आणि ग्रामसेवक गैरहजर असल्याने ग्रामपंचायत सदस्यांकडे निवेदन देण्यात आले.
आमच्या हक्काचा निधी आम्हाला मिळालाच पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समाजबांधवांनी दिला आहे. या संदर्भात सरपंच आणि ग्रामसेवकांकडे अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.