खान्देश टाइम्स न्यूज | २९ जुलै २०२३ | जळगाव जिल्हा दूध संघात शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालकांना एका माजी आमदाराने पिस्तुलचा धाक दाखविल्याची चर्चा होत होती. काहींनी तर गोळीबार झाल्याचे सांगितले मात्र पोलिसांनी चौकशी केल्यावर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.
जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघात शनिवारी सायंकाळी गोळीबार झाल्याची चर्चा जिल्ह्यात वेगाने पसरली. घटनेची माहिती मिळताच लागलीच पोलीस यंत्रणा देखील कामाला लागली. पोलीस अधीक्षक ते स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक सर्व माहिती घेऊ लागले. जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष ते संचालक सर्वांचे फोन खणखणले. काही वेळात जिल्हा दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश भोरखेडे हे देखील शहर पोलीस ठाण्यात पोहचले.
जिल्हा दूध संघात जास्त वेळ प्रतीक्षा करायला लावल्याने एका माजी आमदाराने भोरखेडे यांच्यावर बंदूक रोखल्याची चर्चा होत होती. जवळपास दोन तास हा सर्व प्रकार आणि चर्चा शहर पोलीस ठाण्यात सुरू होती. अखेर भोरखेडे यांनी असा काही प्रकार झालाच नसल्याची माहिती पोलिसांना दिल्यावर संपूर्ण प्रकरण शांत झाले.
काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटातील पदाधिकारी, नेता दुसऱ्या गटात गेल्याने केवळ बदनामी म्हणून ही अफवा पेरण्यात आली होती असे देखील काहींनी सांगितले.