
नशिराबाद : के.एस.टी. उर्दू हायस्कूलच्या चौकशीसाठी शिक्षण विभागाची समिती नियुक्त; पोलिस बंदोबस्तात चौकशी होणार
नशिराबाद : के.एस.टी. उर्दू हायस्कूल, नशिराबाद येथील विविध गैरप्रकारांबाबत करण्यात आलेल्या तक्रारीनंतर शिक्षण विभागाने चौकशी समिती गठित केली आहे. विशेष म्हणजे ही चौकशी पोलिस बंदोबस्तात करण्यात येणार आहे.
तक्रार अर्जातून चौकशीची मागणी
शाळेचे उपाध्यक्ष असलम तनवीर यांनी शिक्षण अधिकारी (माध्यमिक) यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जामध्ये विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरपणे पैसे वसूल करणे, शाळेतील अन्य गैरप्रकार आदी एकूण १६ मुद्दे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
शिक्षण अधिकाऱ्यांचा आदेश
या तक्रारीची दखल घेत शिक्षण अधिकारी (माध्यमिक) कल्पना चौहान यांनी चौकशीस मान्यता दिली आहे. त्यासाठी गट शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी सरला पाटील व उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) रागिनी चौहान यांचा समावेश असलेली चौकशी समिती गठित करण्यात आली आहे.
ही चौकशी २८ ऑगस्ट २०२५, गुरुवार रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. शाळेतील वातावरण तणावपूर्ण होऊ नये यासाठी गट शिक्षण अधिकाऱ्यांनी नशिराबाद पोलिस ठाण्याकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे.
तक्रारदाराची माहिती
“आम्ही केलेल्या तक्रारीनंतर अखेर शिक्षण विभागाने चौकशीस मान्यता दिली आहे. चौकशी निष्पक्ष व्हावी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हक्क सुरक्षित रहावेत, हीच अपेक्षा आहे,” असे तक्रारदार असलम तनवीर यांनी सांगितले.





