खान्देश टाइम्स न्यूज | १७ मार्च २०२४ | जळगाव शहरात एक धक्कादायक घटना घडली असून एका स्कूल व्हॅन चालकाने ४ वर्षीय चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य केले आहे. चिमुकलीने ड्रायव्हर काकांनी बॅड टच केल्याचे आईला सांगितल्यानंतर याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयीत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
पीडित चिमुकलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक ४ वर्षीय बालिका जळगावातील एका शाळेत शिक्षण घेते. चिमुकलीला सकाळी शाळेत सोडण्यासाठी तिचे वडील जातात तर घेण्यासाठी स्कूल व्हॅन लावलेली आहे. दि.१२ रोजी चिमुकली स्कूल व्हॅन क्रमांक एमएच.१३.एझेड.१११८ ने घरी आली. घराजवळ उतरून घरी आल्यावर तिने व्हॅन चालक काकांनी बॅड टच केल्याची माहिती तिच्या आईला दिली. चिमुकलीच्या आईने तिला गुड टच आणि बॅड टच याबाबत शिकवले असल्याने तिने हे सर्व घरी सांगितले.
घडलेला प्रकार दुसऱ्या दिवशी तिच्या आईने शाळेच्या मुख्याध्यापिका यांना सांगितला असता त्यांनी व्हॅन चालकाची व्हॅन बंद केली. मात्र आपल्या मुलीसोबत असे घडले असून इतर कुणी बळी पडू नये यासाठी त्यांनी पोलिसात तक्रार देण्याचे ठरविले. पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी कैलास उर्फ प्रदीप रमेश गायकवाड वय – ४० रा.ओम साई नगर याच्या विरुद्ध भादंवि कलम ३५४ आणि बालकांचे लैंगिक संरक्षण अधिनियम पोक्सो ॲक्ट नुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक रविंद्र बागुल हे करीत आहे. आरोपीला रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.