
पाचोऱ्यात पोलीस ठाणे आणि निवासस्थानाच्या इमारतीचे भूमिपूजन
४८ पोलीस कर्मचारी, २ पीआय आणि १ उपविभागीय अधिकारी यांचे निवासस्थान
पाचोरा प्रतिनिधी
पोलीस ठाणे आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या इमारतीचे शहरातील पोलीस लाईन येथे नव्याने उभारले जात असून याचे भूमिपूजन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. या प्रकल्पासाठी २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या भूमिपूजन सोहळ्याला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंग चदिले, तहसीलदार विजय बनसोडे, मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना आमदार किशोर पाटील म्हणाले, “पोलिसांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे प्राधान्य आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने हा निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे पोलिसांचे राहणीमान सुधारेल.” यासोबतच, नगरदेवळा, कजराव आणि कोळगाव येथे नवीन पोलीस ठाण्यांची गरज असल्याचे नमूद करून, त्वरित प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले. तसेच, भडगाव पोलीस ठाण्याच्या नूतनीकरणासाठीही लवकरच प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
४८ पोलीस कर्मचारी, २ पीआय आणि १ उपविभागीय अधिकारी यांचे निवासस्थान
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी माहिती देताना सांगितले की, नव्या पोलीस ठाण्याच्या इमारतीसह ४८ पोलीस कर्मचारी, २ पीआय (पोलीस निरीक्षक) आणि १ उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासाठी निवासस्थाने उभारली जाणार आहेत. महाराष्ट्र पोलीस हाऊसिंगकडे असलेल्या ४०० प्रस्तावांपैकी पाचोऱ्याची निवड झाली, ही शहरासाठी अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी प्रास्ताविक केले, तर विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले. या नव्या पोलीस ठाणे आणि निवासस्थाने प्रकल्पामुळे शहरातील सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.