आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक
सण-उत्सव शांततेने पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाकडून आवाहन
जळगाव,प्रतिनिधि जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित करण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्यासह विविध पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
शांतता राखण्याची जबाबदारी पोलिसांबरोबर समाजातील प्रतिष्ठित आणि जबाबदार व्यक्तींनीही स्वीकारली पाहिजे. समाजात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी शांतता समिती सदस्यांनी सतर्क राहावे, असे जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी सांगितले. तसेच, समाजात अज्ञानता दूर करण्यावर भर दिला पाहिजे आणि महापुरुषांच्या स्मारकांचा सन्मान योग्य प्रकारे व्हायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या सोशल मीडिया समाजात वाद आणि गैरसमज निर्माण करण्याचे प्रमुख साधन ठरत आहे. विशेषतः १५ ते २५ वयोगटातील युवक सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकत असल्याने वाद उद्भवतात. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारची माहिती पोलिसांपर्यंत तत्काळ पोहोचवावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले.
नागरिकांकडून विविध सूचना
शांतता समितीच्या बैठकीत नागरिकांनी पुढील महत्त्वपूर्ण सूचना दिल्या –आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट पोलिसांना तत्काळ कळवाव्यात, शहरात अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, ११ एप्रिल रोजी महात्मा फुले मार्केट आणि १४ एप्रिलच्या आधी मुख्य मिरवणूक मार्ग अतिक्रमणमुक्त करावा.
शांतता समिती सदस्यांना हेल्मेट वाटप
बैठकीच्या शेवटी, जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शांतता समिती सदस्यांना हेल्मेट वितरित करण्यात आले. वाहतुकीच्या नियमांचे पालन करून अपघात टाळणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी केले, तर आभार अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी मानले.