
महापालिकेचे कचरा संकलनाची वाहने हस्तांतरित करण्याचे वॉटर ग्रेस कंपनीला पत्र
जळगाव प्रतिनिधी महानगरपालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीला मक्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, बीव्हीजी कंपनीने १ जूनपासून काम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या बँक गॅरंटी आणि अनामत रक्कम भरण्याचे निर्देश महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.
या निविदा प्रक्रियेत वॉटरग्रेस कंपनीने देखील सहभाग घेतला होता आणि आपले दर कमी असल्याचा दावा केला होता. मात्र, बीव्हीजीच्या दरांना प्राधान्य देण्यात आले. या निर्णयाविरोधात दोन्ही कंपन्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाही, महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार बीव्हीजीला मक्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर, महापालिकेच्या आरोग्य विभागाने वॉटरग्रेस कंपनीला पत्र पाठवून त्यांच्या ताब्यातील कचरा संकलन वाहने विमा, फिटनेस प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह हस्तांतरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे बीव्हीजी कंपनीला शहरातील कचरा संकलनाचे काम सुरळीतपणे सुरू करता येईल.