
जळगाव शहरात दूषित पाणीपुरवठा !
नळाला येणाऱ्या पाण्याला गटाराचा वास, नागरिक त्रस्त ‘ महापालिका ढिम्म !
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नळाला येणारे पाणी दूषित, गटारासारखा वास येणारे असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यासोबतच अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा ही समस्या अधिकच गंभीर बनली असून, उन्हाळ्याच्या तोंडावर नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.उन्हाळा सुरू झालाय, तापमान वाढतंय, पण नळात पाणी कमी होत चाललंय. काही भागात दोन-दोन दिवस नळातून पाणी येत नाही. जिथे येतं, तिथे ते असह्य वासाचं आणि अशुद्ध!
शहरातील शनीपेठ,बळीरामपेठ , भिलपुरा, जोशीपेठ, काट्या फाईल, शिवाजीनगर, उस्मानिया पार्क, गेंदालाल मिल आणि इस्लामपुरा या भागांतील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून प्रदूषित पाण्याच्या समस्येला सामोरे जात आहेत. काही भागांमध्ये दोन-दोन दिवस नळाला पाणी न येणे, तर काही ठिकाणी येणाऱ्या पाण्याला गटारासारखा उग्र वास येणे, अशा समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत.
महिलांना घरगुती कामांवर आणि आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत आहे. दूषित पाण्यामुळे काही भागांमध्ये पोटदुखी, जुलाब, उलटीसारखे आजार वाढले असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.
या गंभीर परिस्थितीत देखील महापालिका प्रशासनाने अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. पाणी शुद्धीकरण केंद्राकडून योग्य प्रक्रिया होत आहे की नाही, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि संतापाचे वातावरण आहे.स्थानिकांनी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या असूनही केवळ आश्वासनं दिली जात आहेत.
“प्रशासन झोपलेलं आहे का?” असा सवाल आता सामान्य जनतेकडून सरळसरळ विचारला जात आहे.शिवाजीनगर व उस्मानिया पार्क परिसरातील महिलांनी थेट रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. “जर त्वरित पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू,” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण? जलसंपदा विभाग, महापालिका, की स्थानिक लोकप्रतिनिधी? याचं उत्तर कोणीही देत नाही, अशी परिस्थिती आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नवीन पाणीपुरवठा योजनेचं ठोस नियोजन, नियमित शुद्धीकरण आणि देखभाल व्यवस्था उभारण्याची तातडीची गरज आहे, असं मत नागरिक व्यक्त करत आहेत.