
थकबाकीदारांवर कारवाईचा इशारा; ग्रामपंचायत सदस्यांना कर भरण्याचे आवाहन
जळगाव ;- जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना 31 मार्च 2025 पर्यंत त्यांच्या ग्रामपंचायतींकडे असलेल्या कराची थकबाकी भरण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, ज्या ग्रामपंचायत सदस्यांनी 31 मार्च 2025 पर्यंत त्यांच्या कराची थकबाकी भरलेली नाही, त्यांना अपात्र ठरवले जाऊ शकते. कर भरण्याची पावती मिळाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत कर न भरल्यास संबंधित व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य पदावरून, ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच पदावरून अपात्र ठरू शकते.
जिल्हाधिकारी कार्यालयाने ग्रामपंचायत सदस्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या स्थानिक ग्रामपंचायतीकडून कर भरण्याच्या अंतिम मुदतीची माहिती घ्यावी. तसेच, ज्या सदस्यांना कराची पावती मिळाली नसेल, त्यांनी ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायतीशी संपर्क साधून थकबाकीची पावती मिळवावी आणि मुदतीत भरणा करावा. वेळेत कराचा भरणा न केल्यास थकबाकीदारांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.