
ईदनिमित्त भाजपाची ‘सौगात-ए-मोदी’ योजना; 32 लाख मुस्लिम कुटुंबांना भेटवस्तूंचे वाटप
नवी दिल्ली – ईदच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने गरीब मुस्लिम कुटुंबांसाठी विशेष मदतकार्य राबवले जात आहे. ‘सौगात-ए-मोदी’ या नावाने आयोजित या उपक्रमांतर्गत देशभरातील 32 लाख मुस्लिम कुटुंबांना भेटवस्तूंच्या विशेष किट्स वाटण्यात येणार आहेत.
या मोहिमेत भाजपाचे 32 हजार पदाधिकारी सक्रिय सहभाग घेणार असून, देशातील सुमारे 3 हजार मशिदींमध्ये या किट्स पोहोचवण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा उद्देश गरीब मुस्लिम कुटुंबांना ईदचा सण आनंदाने साजरा करता यावा, हा आहे.
काय असणार किटमध्ये?
या ‘सौगात-ए-मोदी’ किट्समध्ये ईदसाठी आवश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये शेवया, खजूर, सुका मेवा, साखर यांसारखे खाद्यपदार्थ तसेच महिलांसाठी सूटचे कापड आणि पुरुषांसाठी कुर्ता-पायजमा यांचा समावेश आहे.
भाजपाचा सर्वसमावेशक दृष्टिकोन
भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी सांगितले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक सणात सहभागी होतात आणि सर्वांच्या आनंदात सामील होतात. गरीब मुस्लिम कुटुंबांसाठी ही विशेष भेट देण्याचा आमचा संकल्प आहे. यामुळे समाजातील वंचित कुटुंबांना मदत मिळेल.”
या उपक्रमाची सुरुवात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीतील निजामुद्दीन येथे करण्यात आली. भाजपाच्या या उपक्रमामुळे सामाजिक ऐक्य व समरसतेला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.