
जळगावच्या मध्यवर्ती भागात चारचाकी वाहनांवर निर्बंध !
गुढीपाडवा आणि रमजान ईद खरेदीसाठी बाजारात गर्दी
जळगाव प्रतिनिधी
गुढीपाडवा (रविवार) आणि रमजान ईद (सोमवार) निमित्ताने शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी वाढू लागली आहे. परिणामी वाहतुकीची कोंडी होत असल्याने २६ मार्चपासून पुढील पाच दिवस शहराच्या मध्यवर्ती भागात चारचाकी वाहनांसाठी बंदी लागू करण्यात येणार आहे. या भागांमध्ये उद्यापासून (२६ मार्च) चारचाकी वाहनांना बंदी: सुभाष चौक , टॉवर परिसर , राजकमल टॉकीज परिसर , गांधी मार्केट , फुले मार्केट येथे चारचाकी वाहनांसाठी बंदी घालण्यात आली आहे. वाहतुकीची शिस्त राखण्यासाठी वाहतूक शाखेकडून या ठिकाणी बॅरिकेड्स बसवले जात आहेत.
जळगावचे तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचले असून, दुपारच्या उन्हात (३ ते ५ वाजेपर्यंत) गर्दी कमी असली तरी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत बाजारात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
शनिपेठ, बळीरामपेठ, सुभाष चौक, गांधी मार्केट आणि फुले मार्केटमध्ये खरेदीला वेग आला आहे. मात्र, दोन्ही बाजूला रस्त्यावरच हॉकर्स आणि हातगाडीवाल्यांनी दुकानं लावल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रचंड गर्दी होत असल्याने प्रशासनाने चारचाकी वाहनांवरील निर्बंध लागू केले आहेत.
वाहतूक शाखेच्या नियोजनानुसार बॅरिकेड्स उभारण्यात येणारी ठिकाणे: टॉवर चौक ते घाणेकर चौक गांधी मार्केट चौक राजकमल टॉकीज ते सुभाष चौक (बोहरा मशीद जवळ) चित्रा चौक ते पोलनपेठ मार्ग असे चारचाकी वाहनांसाठी बंद राहणार आहेत
बाजारात जाणाऱ्या नागरिकांनी वाहतूक नियमानुसार पार्किंग व्यवस्थेचा योग्य वापर करावा. गर्दी टाळण्यासाठी शक्यतो सकाळी किंवा दुपारच्या वेळेत खरेदी करावी. सार्वजनिक वाहतूक किंवा दुचाकीचा वापर करणे अधिक सोयीचे ठरेल.