
अपार्टमेंटमधून भरदिवसा इन्व्हर्टर बॅटरीची चोरी ; सीसीटीव्हीत चोरटे कैद
चार जण ताब्यात
जळगाव: मोहाडी रोडवरील नूतन वर्षा कॉलनीत भरदिवसा अपार्टमेंटच्या जिन्याखाली असलेल्या सेफ्टी डोअरचे कुलूप तोडून दोन इन्व्हर्टर बॅटऱ्या चोरून नेल्याची घटना दि. १५ मार्च रोजी घडली. या घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे.
गोविंद विष्णू मराठे या चटई व्यावसायिकांचे मालकीचे चार मजली अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये दैनंदिन लोडशेडिंगच्या पार्श्वभूमीवर जिन्याखाली तीन मोठ्या इन्व्हर्टर बॅटऱ्या बसवण्यात आल्या होत्या. दि. ९ मार्च रोजी दुपारी दोन वाजता अज्ञात इसमांनी सेफ्टी डोअरचे कुलूप तोडून १९ हजार रुपये किंमतीची बॅटरी चोरली. त्यानंतर दि. १५ मार्च रोजी दुपारी २१ हजार रुपये किंमतीची दुसरी बॅटरी देखील चोरीस गेली.
चोरी उघडकीस आल्यानंतर मराठे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक तरुण तोंडाला रुमाल बांधून अपार्टमेंटमध्ये शिरताना दिसला. त्याच्या मागून दुसरा इसम दुचाकीवरून आला आणि दोघांनी बॅटऱ्या चोरून नेल्याचे दिसले. चोरीच्या घटनेचे फुटेज पोलिसांच्या ताब्यात असून त्यावरून चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
चारचाकी वाहनातून पलायन:
चोरीनंतर बॅटऱ्या चारचाकी वाहनातून नेत असल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. पोलिसांनी चौघा उच्चशिक्षित आरोपींविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील चौकशी सुरू असून लवकरच आणखी तपशील समोर येण्याची शक्यता आहे.