
वैद्यकीय सेवा देताना माणुसकी जपा” – डॉ. केतकीताई पाटील
डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ
जळगाव (प्रतिनिधी) – “डॉक्टर झालो म्हणजे पैसे देणारे झाड गवसले असे नसते, तर वैद्यकीय सेवा करताना माणुसकी जपणे महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकीताई पाटील यांनी केले. त्या डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या सन २०१९ बॅचच्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
डॉ. पाटील म्हणाल्या, “२०१९ ची बॅच ही अतिशय कठीण काळातून गेली आहे. कोरोनामुळे शैक्षणिक प्रवासात अडथळे आले, परंतु पालकांचा व विद्यार्थ्यांचा विश्वास कायम राहिल्याने आजचा हा गौरवाचा क्षण शक्य झाला.”
त्यांनी पुढे सांगितले, “तुम्हाला आज पदवी मिळाली असली, तरी आता खऱ्या अर्थाने जबाबदारीची सुरुवात होते. शहरी भागात अनुभव घ्या, पण ग्रामीण भागातील आरोग्यसेवा ही खरी गरज आहे. तिथे वैद्यकीय सेवा देताना सहानुभूती आणि माणुसकी जपणे आवश्यक आहे.”
दीक्षांत समारंभात ५३ विद्यार्थ्यांना पदवी
समारंभात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या पाल्याला पदवी मिळाल्याचा अभिमान आणि आनंद त्यांच्या डोळ्यांतून व्यक्त होत होता.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्वीकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित, होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश मिश्रा, डॉ. पंकज शर्मा, डॉ. आरती शिलाहार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी ऑनलाईन उपस्थिती नोंदवत विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले.
समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. श्रद्धा पाटील व दीपेश सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. पंकज शर्मा यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजीव जामोदकर, ललित महाजन आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.