
शेताच्या वारसाच्या वादातून दोघांवर चाकूने वार !
एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा
जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत शेताच्या वारस लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन व्यक्तींना वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना ११ एप्रिल २०२५ दुपारी घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ११ एप्रिल २०२५ रोजी दुपारी सुमारे २.१५ वाजता सदाशिव नगर, शेरा चौक, मेहरून येथे फिर्यादी सुलतान हशम सय्यद (वय ३८, रा. दत्तनगर, मेहरून) हे तौफिक कय्युम पिंजारी यांच्या घरी असताना आरोपी अस्लम सशोद्दीन पिंजारी आणि शफिक गफुर पिंजारी हे घरात घुसले. शेताच्या वारस हक्कावरून वाद झाला आणि त्यात शिवीगाळ, दमदाटी करत आरोपींनी चापटाबुक्यांनी मारहाण केली.
वाद इतका टोकाला गेला की, आरोपी अस्लमने आपल्या खिशातून कांदे कापण्याचा चाकू काढून तौफिकच्या कंबरेजवळ पोटावर वार केला. या झटापटीत भांडण सोडविण्यास गेलेले फिर्यादी सुलतान यांनाही चाकूने दुखापत झाली.
दोघांनाही तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यन्च्यवर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहेत.