
दोघा मेव्हण्यांकडून शालकाचा खून: शेतजमीन वादातून झाला होता चाकूहल्ला
उपचारादरम्यान झाले निधन, खुनाचे कलम वाढविले
जळगाव खान्देश टाइम्स न्यूज नेटवर्क
शेतजमिनीच्या वारसदारावरून झालेल्या वादातून तौफिक कल्लूम पिंजारी (वय ३२, रा. सदाशिवनगर, मेहरुण) यांच्यावर त्यांच्या मेव्हण्यांनी चाकूहल्ला केला. ११ एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात तौफिक गंभीर जखमी झाले होते. तीन दिवस खासगी व शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिल्यानंतर १४ एप्रिल रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवले असून, फरार मेव्हणे अस्लम सशोद्दीन पिंजारी आणि शफिक गफूर पिंजारी यांचा शोध घेतला जात आहे.
तौफिक हे मालवाहू रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यानंतर शेतजमिनीच्या वारसावरून तौफिक आणि त्यांचे मेव्हणे अस्लम व शफिक यांच्यात वाद सुरू होता. ११ एप्रिल रोजी दोन्ही मेव्हण्यांनी तौफिक यांच्या घरी जाऊन शिवीगाळ आणि मारहाण केली. यात अस्लमने तौफिक यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला चाकूने वार केला.उपचारादरम्यान मृत्यू:
११ एप्रिलपासून तौफिक यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. १३ एप्रिल रोजी प्रकृती खालावल्याने त्यांना दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तिथेही प्रकृती गंभीर झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना १४ एप्रिल रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
मृत्यूची बातमी समजताच नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केली.तौफिक यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. दोन महिन्यांपूर्वीच वडिलांचे निधन झाल्याने कुटुंब आधीच दुःखामध्ये होते. आता तौफिक यांच्या मृत्यूने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
हल्ल्यानंतर अस्लम आणि शफिक फरार झाले आहेत. एमआयडीसी पोलिसांनी सुरुवातीला मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. तौफिक यांच्या मृत्यूनंतर खुनाचे कलम वाढवून दोन्ही मेव्हण्यांचा शोध सुरू केला आहे.