
चाळीसगावात गावठी कट्टा विक्रीच्या तयारीत असलेल्या संशयिताला एलसीबीने घेतले ताब्यात
जळगाव : चाळीसगाव येथे गावठी कट्टा विक्रीसाठी जाणाऱ्या मुद्दसीर नझर सलीम परवेझ शेख (रा. तांबापुरा, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा, पाच जीवंत काडतुसे, तलवार आणि दुचाकी (एमएच ४७, बीयू ०३७७) जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एलसीबीला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मुद्दसीर हा तांबापुरा परिसरातून चाळीसगावला कट्टा विक्रीसाठी निघाला होता. यानंतर शिरसोली रस्त्यावरील जकातनाका येथे सापळा रचून उपनिरीक्षक शरद बागल, सफौ अतुल वंजारी, राजेश मेढे, हरिलाल पाटील, विजय पाटील आणि अक्रम शेख यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून धारदार शस्त्र आणि कट्ट्यासह काडतुसे आढळून आली. पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.