फैजपूर :- अवैधरित्या वाळूची सर्रासपणे वाहतूक करणाऱ्या डंपरचा पाठलाग करणाऱ्या सहाय्य्क पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या पथकाच्या वाहनाला धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ८ मार्च रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हिंगोणा शिवारातील एच.पी.पेट्रोल पंपासमोर घडली. या घटने प्रकरणी डंपर मालक, चालक व क्लीनर अशा तिघांविरुद्ध फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून तिघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी डंपर चालक मयूर सुरेश कोळी (30, डांभूर्णी, ता.यावल) याला अटक केली आहे.दरम्यान पोलिसांच्या वाहनाला धडक देण्याच्या प्रयत्नात डम्पर रस्त्याच्या कडेला शेतात पलटी झाले.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, फैजपूरच्या सहा.पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांना यावल रोडवर अवैध वाळू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर त्यांनी पोलीस नाईक अल्ताफ अली, दिलीप तायडे, गणेश मनोरे, सुमित बाविस्कर यांच्या पथकाला खाजगी वाहना द्वारे (एम.एच.02 बी.झेड.2986) सोबत घेऊन हिंगोणा शिवारातील एच.पी.पेट्रोल पंपासमोर थांबविले असता यावेळी यावलकडून फैजपूरकडे जात असलेल्या अवैध वाळूचा डंपर (एम.एच.40 एन.6588) ला इशारा करून थांबण्याचा प्रयत्न केला. मात्र डंपर चालकाने भरधाव वेगाने पुढे नेल्याने पथकाने पाठलाग केला असता डंपर चालकांने वारंवार पोलिसांच्या वाहनाला साईड न देता नंतर मागून धडक दिली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही . मात्र धडक दिल्यानंतर डंपर रस्त्याच्या कडेला शेतात पलटी झाले.
यावेळी पोलीस पथकाने डंपर चालक मयूर कोळी व क्लीनर प्रशांत उर्फ दादू पुरुषोत्तम पाटील (डांभूर्णी, ता.यावल) यास अटक केली तर या प्रकरणात डंपर मालक ज्ञानेश्वर उर्फ नाना नामदेव तायडे (कोळन्हावी) यालाही आरोपी करण्यात आले. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून पोलीस नाईक अल्ताफ अली यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक निलेश वाघ फौजदार बबन पाटोळे तपास करीत आहे.