
अमळनेरजवळ मालगाडी घसरली; सुरत-भुसावळ रेल्वे मार्ग ठप्प, दुरुस्तीचे काम सुरू
अमळनेर : भुसावळहून नंदुरबारच्या दिशेने जाणारी मालगाडी गुरुवारी (दि. १५ मे) दुपारी दोनच्या सुमारास अमळनेरजवळील प्रताप महाविद्यालयाजवळ रुळावरून घसरल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, लोको पायलट व गार्ड सुखरूप आहेत.
अपघातानंतर मालगाडीचे काही डबे रुळावरून घसरले, ज्यामुळे आजूबाजूच्या रुळांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
घटना समजताच रेल्वे प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, लवकरात लवकर मार्ग पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, रेल्वे अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.