
पोलीस ठाण्याजवळच चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेची पर्स हिसकावून १४ हजारांचा ऐवज लांबवला
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील टॉवर चौकात, पोलीस ठाण्यापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर, चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या हातातील पर्स हिसकावून नेली. रविवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
चोपडा तालुक्यातील गर्जुर अळी येथील जानकाबाई भगवान पाटील (वय ५२) या चोपडा जाण्यासाठी टॉवर चौकात बसची वाट पाहत होत्या. बस आल्यानंतर, त्या चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील पर्स हिसकावून पलायन केले. पर्समध्ये ४,७०० रुपये किमतीचे सोन्याचे पंखे आणि ९,४५० रुपयांची कानातील सोन्याची बाली असा एकूण १४,१५० रुपयांचा ऐवज होता.
या प्रकाराची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टॉवर चौकात वाढत्या चोरीच्या घटना
टॉवर चौकात यापूर्वीही अशा घटना घडल्या असून, मार्च महिन्यात चोपड्याच्या एका महिलेला याच ठिकाणी बसमध्ये चढताना गळ्यातील सोनपोत गमवावी लागली होती. तसेच यावल तालुक्यातील एका व्यक्तीची बॅग लंपास करण्यात आली होती. वारंवार होणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
पोलिसांचा धाक संपल्याची चर्चा
पोलीस ठाण्याच्या अवघ्या शंभर मीटर अंतरावर अशी घटना घडणे, हे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले आहे. दिवसाढवळ्या महिलांच्या हातातील पर्स आणि गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने टॉवर चौकातील सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त व बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.