
पाचोरा बसस्थानकात वृद्धाची फसवणूक; ४० हजारांची अंगठी लंपास
पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील बस स्थानक परिसरात एका वृद्धाची ४० हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी अज्ञात चोरट्याने हातचलाखीने लंपास केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
राजीव गांधी कॉलनीतील पीतांबर गोविंद पाटील (वय ६५) हे कामानिमित्त पाचोरा बसस्थानक परिसरात आले होते. यादरम्यान, एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधत, “सध्या परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, तुम्ही सोन्याची अंगठी घालून फिरू नका,” असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
क्षणातच त्या चोरट्याने हातचलाखीने पाटील यांच्या बोटातील ४० हजारांची अंगठी काढून पोबारा केला. काही वेळातच फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी तात्काळ पाचोरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या घटनेचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल वसिम शेख करत असून, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या सल्ल्याला बळी न पडता सतर्क राहावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी केले आहे.