खान्देशजळगांवशासकीयसामाजिक

भाडेवाढीच्या निषेधार्थ १६ मार्केट बंद; गाळेधारकांचे महापालिका आयुक्तांना निवेदन

भाडेवाढीच्या निषेधार्थ १६ मार्केट बंद; गाळेधारकांचे महापालिका आयुक्तांना निवेदन

जळगाव : महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांसाठी प्रस्तावित भाडेवाढीच्या निषेधार्थ सोमवारी (२६ मे) शहरातील १६ मार्केटमधील गाळेधारकांनी आपले व्यवसाय दुपारी २ वाजेपर्यंत बंद ठेवत आंदोलन केले. रेडीरेकनर दराच्या ५ टक्के प्रमाणे भाडे आकारणीचा महापालिकेचा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप गाळेधारक संघटनांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर गाळेधारकांनी महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

महापालिकेच्या ताब्यातील २,३६८ गाळ्यांचे भाडेकरार कालबाह्य झाले असून, नव्याने भाडे निश्चित करण्याचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. अलीकडेच महापालिकेने रेडीरेकनर दराच्या पाच टक्के प्रमाणे भाडे आकारण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, हे दर वास्तविक मार्केटच्या परिस्थितीच्या तुलनेत अतिरीक्त असून, अविकसित मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांना ते परवडणारे नाहीत, असा आक्षेप गाळेधारकांनी नोंदवला आहे.

या निर्णयाविरोधात एकवटलेल्या व्यापाऱ्यांनी शहरातील छत्रपती शाहू मार्केट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, महात्मा गांधी मार्केट, रामलालजी चौबे मार्केट, धर्मशाळा मार्केट, भास्कर मार्केट, नानीबाई अग्रवाल मार्केट, वालेचा मार्केट, जुने शाहू मार्केट, जुने बी. जे. मार्केट आदी १६ मार्केटमध्ये व्यवहार बंद ठेवले.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात, या भाडे दरामध्ये फेरबदल करून व्यवहार्य दर ठरवावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी डॉ. शांताराम सोनवणे, राजस कोतवाल, युवराज वाघ, आशिष सपकाळे, प्रदीप मंडोरा, सुरेश पाटील, तेजस देपुरा, वसीम काझी, पंकज मोमाया, कमलेश तलरेजा, शिरीष थोरात, गिरीश अग्रवाल, राजेश समदाणी, हेमंत परदेशी, संजय अमृतकर, विनोद पांडे, अनिल पाटील, ऋषी सोळुंके, संभाजी निंबाळकर, योगेश बारी, केशव नारखेडे, ललित मराठे, अमित भागवाणी यांसह अनेक व्यापारी उपस्थित होते.

गाळेधारकांच्या या आंदोलनामुळे महापालिकेच्या भाडे धोरणावर पुन्हा एकदा पुनर्विचार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button