जिल्हा परिषदेतील शिवाजी महाराज पुतळ्याच्या साफसफाईसाठी शिवभक्ताचा अर्ज

जिल्हा परिषदेतील शिवाजी महाराज पुतळ्याच्या साफसफाईसाठी शिवभक्ताचा अर्ज
जळगाव प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरातील झाडेझुडपांची छाटणी, साफसफाई आणि रंगरंगोटीसाठी जळगावातील एका शिवभक्ताने जिल्हा परिषदेकडे अर्ज केला आहे.
शिवाजीनगर भागातील धनाजी काळे नगर येथील रहिवासी राजू उर्फ लहेरी गणपत चौरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सविनय निवेदन सादर करून ही मागणी केली आहे.निवेदनात चौरे यांनी नमूद केले आहे की, जिल्हा परिषद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आवाराची बऱ्याच काळापासून देखभाल झालेली नाही. परिणामी, परिसर काळवंडलेला असून, वाढलेली झाडेझुडपे आणि झाडांच्या फांद्यांमुळे पुतळ्याचे दर्शन घेण्यास अडथळा निर्माण होत आहे.
तसेच, पुतळ्याची रंगरंगोटीही बऱ्याच काळापासून झालेली नसल्याने या पवित्र स्थळाची शोभा कमी झाली आहे.
चौरे यांनी जिल्हा परिषदेला विनंती केली आहे की, या परिसरातील झाडांची छाटणी, पुतळ्याची साफसफाई आणि रंगरंगोटी करून या स्थळाची शोभा वाढवावी. त्यांनी याबाबत तातडीने कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.स्थानिक शिवभक्त आणि नागरिकांच्या भावनांचा आदर करत, जिल्हा परिषदेकडून या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. पुतळ्याच्या देखभालीसाठी लवकरच आवश्यक पावले उचलली जातील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.