भरधाव आयशरच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

भरधाव आयशरच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
खान्देश टाइम्स न्यूज l ३० जून २०२५ l – चाळीसगाव तालुक्यातील खडकी गावाजवळ जळगाव-चांदवड महामार्गावर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. शेतासाठी खत घेऊन परतणाऱ्या दुचाकीस्वारांना भरधाव आयशर वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
मृत शेतकऱ्याचे नाव आबा जानराव धनगर (वय ३५, रा. खडकी, ता. चाळीसगाव) असे असून, भगवान कोल्हे (वय २६) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर आयशर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.
अपघाताची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर उतरून तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडले. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. ग्रामस्थांनी अनेक वेळा गतिरोधक बसवण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती, मात्र दुर्लक्ष झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत ग्रामस्थ आक्रमक झाले होते.
पोलीस प्रशासनाने तत्काळ गतिरोधक बसवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.