
गर्भपातासाठी छळ; पाच महिन्याच्या गर्भवती विवाहितेची आत्महत्या
शिरसोली येथील घटनेने परिसरात खळबळ ; आत्महत्या पूर्वी लिहिली सुसाईड नोट
जळगाव : शिरसोली प्र.न. येथील प्रज्ञा चेतन शेळके (वय २२, रा. कर्जयी, ता. चाळीसगाव) या पाच महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने गुरुवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने सुसाईट नोट लिहून सासरच्यांकडून होणाऱ्या छळ आणि गर्भपातासाठी केलेल्या दबावाचे धक्कादायक आरोप केले आहेत. ही सुसाईट नोट पोलिसांनी जप्त केली असून घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.
प्रज्ञाचा विवाह काही महिन्यांपूर्वी चेतन शेळके यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर दाम्पत्य पुण्यात राहत होते. मात्र पाच महिन्यांची गरोदर असल्याने प्रज्ञा मागील महिनाभर माहेरी शिरसोली येथे आली होती. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घरात कोणी नसताना प्रज्ञाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. शेतातून परतलेल्या तिच्या आई-वडिलांना दरवाजा आतून बंद आढळल्याने त्यांनी तोडून आत प्रवेश केला असता प्रज्ञा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
गर्भपातासाठी दबाव आणि मारहाण
माहेरच्यांच्या माहितीनुसार, प्रज्ञाला सासरच्यांकडून सतत त्रास दिला जात होता. गर्भपात करण्यासाठी तिला दबाव टाकला जात होता आणि मारहाण देखील केली जात होती. या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळूनच प्रज्ञाने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे माहेरच्यांचे म्हणणे आहे.
सुसाईट नोटमधील आरोप
आत्महत्येपूर्वी प्रज्ञाने लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये तिने सासू, सासरे व इतर नातेवाईकांवर मारहाण आणि गर्भपातासाठी जबरदस्तीचे गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी सुसाईट नोट जप्त केली असून, त्यावरून पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
आत्महत्येपूर्वी लिहिली सूसाईट नोट
मीस यू मम्मी-पप्पा…
मी प्रज्ञा चेतन शेळके माझ्यावर अत्याचार झाला आहे, मला माझ लग्र झाल मी कामाला जायची, ज्यावेळेस मी प्रेग्रेट राहीली. त्यावेळेस माझ्या घरच्यांनी मला क्रिटींक करायला सांगितले, तर मी नाही म्हणत होती. त्यांनी मला गावावर आणून मारहाणही केली. मी माझ्या आई-वडीलांना सांगितले तर त्यांनी त्यांचे नातेवाईक जमा केले. माझ्या मावस सासू सासऱ्यांनी मला मारहाण केली.
माझे सासू-सासरे व दीर, नवरा मला मारहाण करायला लागले. माझ्या आई-वडीलांसोबत त्यांच्याकडे आली, तर त्यांनी लय टेंशन घेतले. त्यांनी माझ्या लहान मुलीच अस कसकाय झाल अस म्हणून लय टेंशन घेतल होत. त्यांनी ट्रिटमेंट केली तर माझ्या मनाला योग्य नाही वाटल. मी मानसिक तणावामुळे आत्महत्या केली. मला माफ करा मम्मी-पप्पा सॉरी.. असा मजकूर विवाहितेने आत्महत्येपुर्वी लिहीलेल्या सुसाईट नोटमध्ये लिहीला आहे.





