इतर

हातेडजवळ दरोड्याच्या तयारीत असलेले चौघे जेरबंद; पोलिसांची मध्यरात्री कारवाई

हातेडजवळ दरोड्याच्या तयारीत असलेले चौघे जेरबंद; पोलिसांची मध्यरात्री कारवाई

चोपडा (प्रतिनिधी) | चोपडा तालुक्यातील हातेड गावाजवळील युग पेट्रोल पंपाजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना चोपडा ग्रामीण पोलिसांनी मध्यरात्रीच्या कारवाईत अटक केली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून ३ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातेडजवळ काही संशयित दरोडेखोर दोन दुचाकीवर फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक कविता कमलाकर यांना मिळाली. त्यांनी पथकाला तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, २८ मे रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून सोनू चक्कर चव्हाण (वय २५), यशवंत निराधार पवार (वय ४२), धर्मा चिमण भोसले (वय ४०) आणि भरत निराधार पवार (वय ३८, सर्व रा. जामदे, ता. साक्री, जि. धुळे) या चौघांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चार मोबाईल फोन, दोन दुचाकी, लाल मिरची पावडर व पिवळ्या पट्ट्या असा एकूण ३ लाख २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपींचा इतर चोरी किंवा दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गजानन पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवारे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button