जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात आता नवीन १६ वाहने

जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात आता नवीन १६ वाहने
२ कोटी १२ लाखांचा निधी मंजूर
जळगाव l प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या ताफ्यात लवकरच १६ नव्या अत्याधुनिक गाड्यांचा समावेश होणार आहे. यामध्ये १५ महिंद्रा स्कॉर्पिओ आणि १ महिंद्रा ७०० या वाहनाचा समावेश असून, यासाठी राज्य शासनाकडून सुमारे २ कोटी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या नव्या गाड्यांमुळे जिल्ह्यातील पोलिस दलाचे कामकाज अधिक प्रभावी, गतिमान आणि आधुनिक होणार आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, गस्त वाढवणे, तसेच आपत्कालीन प्रसंगी वेगाने प्रतिसाद देणे अशा बाबतीत या गाड्या मोलाची भूमिका बजावतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या पुढाकाराने ही गाड्यांची मागणी शासनाकडे सादर करण्यात आली होती. आता शासनाच्या मान्यतेनंतर लवकरच या गाड्या पोलिस दलाच्या सेवेत दाखल होतील. या वाहनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जीपीएस सिस्टम, वायरलेस सेटअप आदी सुविधा असणार आहेत. गावागावांतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही मोठी पावले उचलली जात असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.