इतर

सुप्रीम कॉलनीत ‘कूल रूफ सोल्युशन’चे काम सुरू

सुप्रीम कॉलनीत ‘कूल रूफ सोल्युशन’चे काम सुरू

पत्र्याच्या घरांतील तापमानात १० अंशांनी घट

जळगाव (प्रतिनिधी): शहरातील वाढत्या उष्णतेला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी “महाराष्ट्रातील उष्णता व पाणी ताण कमी करण्यासाठी निसर्ग आधारित उपाय” या प्रकल्पांतर्गत ‘कूल रूफ सोल्युशन’ उपक्रमाचा शुभारंभ महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते झाला आहे. मंगळवारी सुप्रीम कॉलनीत कामाची सुरुवात महापौरांच्या उपस्थितीत करण्यात आली. या उपक्रमामुळे घरांच्या तापमानात तब्बल १० अंश सेल्सिअसपर्यंत घट झाल्याचे समोर आले आहे.

ऑल इंडिया डिझास्टर मेटिगेशन इन्स्टिट्यूट (AIDMI), अहमदाबाद, प्रॅक्टिकल ॲक्शन, कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था आणि जळगाव महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने या प्रकल्पांतर्गत पत्र्याच्या घरांवर विशेष सोलर रिफ्लेक्टिव्ह रंगाचा (Solar Reflective Paint) डबल कोट दिला जातो. यामुळे सूर्याच्या किरणांचे परावर्तन होऊन घरातील तापमान लक्षणीयरीत्या कमी राहते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेदहा वाजता झाली. महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते प्रकल्पाच्या बॅनरचे अनावरण करून उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपआयुक्त पंकज गोसावी, नगरसेविका अनिता भापसे, पर्यावरण विभागाचे प्रकाश पाटील, महिला हाउसिंग ट्रस्टचे मनिषा नाफडे यांच्यासह इतर अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी प्रत्यक्ष रंग केलेल्या आणि न केलेल्या घरांमधील तापमान मोजले. यावेळी रंग केलेल्या घरांतील वातावरण लक्षणीयरीत्या थंड असल्याचे आढळले असून, दोन्ही घरांच्या तापमानात सुमारे १० अंश सेल्सिअसचा फरक दिसून आला. महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः चार ते पाच घरांचे तापमान तपासून या प्रकल्पाच्या परिणामकारकतेचे कौतुक केले. या प्रकल्पाचा विस्तार जळगाव शहरातील विविध भागांमध्ये केला जात आहे. यामध्ये समतानगर, तांबापुरा, सुप्रीम कॉलनी, पिंप्राळा हुडको येथील प्रत्येकी १०० पत्र्यांची व ३०० स्क्वेअर फुट खालील काँक्रीटची घरे असे एकूण ४०० घरांवर सोलर रिफ्लेक्टिव्ह पेंट मारला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button