‘त्या’ १५ लाखांच्या डीलमागे नेमकं कोण?

‘त्या’ १५ लाखांच्या डीलमागे नेमकं कोण?
शाखा अभियंता अटकेत; वरिष्ठ अधिकारी, नगरसेविका व मुलगा एसीबीच्या रडारवर
जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता योगेश अहिरे याला १५ लाख रुपयांच्या लाचेच्या प्रकरणात एसीबीने रंगेहाथ पकडल्यानंतर आता या प्रकरणाचे धागेदोरे आणखी खोलवर जात असल्याचे समोर येत आहे. लाच प्रकरणात एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव पुढे येत असून वार्ड क्रमांक १४ मधील नगरसेविकेच्या मुलाचाही संबंध उघड झाल्याने एसीबीने चौकशीची व्याप्ती वाढवली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तक्रारदार कंत्राटदाराने विनोबानगर परिसरातील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे ८० लाख ३९ हजार ७४२ रुपयांचे काम पूर्ण केले होते. त्यापैकी ५८ लाख रुपयांचे बिल मंजूर झाले होते, तर उर्वरित ३८ लाख ४९ हजार रुपयांचे बिल प्रलंबित होते. हे बिल मंजूर करून देण्यासाठी सुरुवातीला १८ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर १५ लाख रुपये देण्याचे ठरले. त्यातील साडेसात लाख रुपये स्वतःसाठी तर उर्वरित रक्कम वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी असल्याचे अहिरे याने सांगितल्याचा आरोप आहे.
या व्यवहारातील पहिला हप्ता म्हणून पाच लाख रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) याला रंगेहाथ अटक केली होती. रविवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश आर. एस. साळगांवकर यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले.
दरम्यान, लाच स्वीकारताना अहिरे याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव घेतल्याने त्या अधिकाऱ्याची आता समोरासमोर चौकशी होणार आहे. या व्यवहाराशी त्याचा नेमका काय संबंध आहे, याचा शोध एसीबी घेत आहे. त्याचबरोबर प्रलंबित बिलाशी संबंधित मूळ कागदपत्रे, तपासणी अहवाल आणि अन्य नोंदीही जप्त केल्या जाणार आहेत.
या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, पडताळणीदरम्यान अहिरे याने वार्ड क्रमांक १४ मधील नगरसेविकेच्या मुलगा आशुतोष पाटील याला एकूण रकमेच्या सहा टक्के कमिशन देण्याचा सल्ला तक्रारदाराला दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नगरसेविका आणि त्यांच्या मुलाचा या व्यवहाराशी काय संबंध आहे, याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे.
एसीबीने अहिरे याचे कार्यालय सील केले असून त्याच्या उपस्थितीत कार्यालयाची झडती घेण्यात येणार आहे. या तपासातून आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी इतर कंत्राटदारांकडूनही अहिरे याने स्वतःसाठी किंवा वरिष्ठांसाठी लाच घेतली आहे का, याचाही तपास होणार आहे.
याशिवाय, वर्ग-दोन अधिकारी असलेल्या अहिरे याने भ्रष्ट मार्गाने मोठ्या प्रमाणात अपसंपदा जमा केल्याची शक्यता एसीबीने व्यक्त केली आहे. त्याच्या मालमत्ता, आर्थिक गुंतवणूक आणि व्यवहारांचीही चौकशी केली जाणार असल्याने हे प्रकरण आणखी गंभीर वळणावर जाण्याची चिन्हे आहेत.





