मोबाईल चोरी करणारी टोळी गजाआड; दोघांना अटक, एक फरार

मोबाईल चोरी करणारी टोळी गजाआड; दोघांना अटक, एक फरार
जळगाव (प्रतिनिधी) –गोलाणी मार्केटमधील मोबाईल दुकान फोडणाऱ्या टोळीचा जळगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दोन चोरट्यांना अटक झाली असून, एकजण फरार आहे. पोलिसांनी संशयितांकडून ३० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल जप्त केले आहेत.
१२ मे रोजी पहाटे गोलाणी मार्केटमधील ‘पूजा मोबाईल शॉपी’मध्ये चोरट्यांनी शटर तोडून ५० हजारांचे मोबाईल आणि साहित्य चोरले. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या सूचनेनुसार तपासाला गती देण्यात आली.
शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी यांच्या नेतृत्वाखाली सपोनि रामचंद्र शिखरे, सफौ सुनील पाटील, पोहेकॉं संतोष खवले, उमेश भांडारकर, सतिष पाटील, भास्कर ठाकरे, किशोर निकुंभ, योगेश पाटील, अमोल ठाकूर, राहुल पांचाळ आणि प्रणय पवार यांच्या पथकाने तपास सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे समीर युसूफ शेख (वय १९, रा. पिंप्राळा हुडको) आणि अबरार उर्फ चिरक्या हमीद खाटीक (वय २०, रा. उमर कॉलनी) यांना अटक करण्यात आली. त्यांचा साथीदार अनिल उर्फ मारी भगवान सोनवणे (वय १९, रा. पिंप्राळा हुडको) फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
सराईत गुन्हेगार
अबरार खाटीकवर यापूर्वी रामानंदनगर पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आहे, तर फरार अनिल सोनवणेवर घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.
**तपास सुरू**
पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, फरार आरोपीला लवकरच अटक होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.