स्वस्त सोन्याच्या आमिषाने २५ लाखांची शेअर दलालाची फसवणूक; सांगलीतील सात जणांवर गुन्हा

स्वस्त सोन्याच्या आमिषाने २५ लाखांची शेअर दलालाची फसवणूक; सांगलीतील सात जणांवर गुन्हा
जळगाव: स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखवून जळगावातील शेअर दलालाची २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सांगलीच्या लिंगनूर (ता. मिरज) येथे घडलेल्या या प्रकरणी सराईत गुन्हेगार लक्ष्मण नाईकसह सात जणांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला
.यश रडे (वय २४, रा. लक्ष्मीनगर, जळगाव; सध्या रा. पुणे) हे शेअर दलाल असून, त्यांचा संपर्क लक्ष्मण नाईक (रा. लिंगनूर) याच्याशी आला. नाईकने स्वस्त सोने देण्याचे सांगून रडेंना लिंगनूरला बोलावले. पहिल्या भेटीत सोने उपलब्ध नसल्याचे सांगितले आणि काही दिवसांनी पुन्हा बोलावले. मार्चमध्ये नाईकने सोने आल्याचे सांगत २५ लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले.रडे २५ लाख घेऊन लिंगनूरला गेले. शेतात सोने दाखवत असताना पोलिसांच्या वेशातील दोन अनोळखी व्यक्ती आल्या आणि सर्वजण पळाले. नाईकने पैसे पोलिसांनी घेतल्याचे सांगून परत मिळवण्याचे आश्वासन देत रडेंना परत पाठवले. महिनाभर टाळाटाळ झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रडेंनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली.लक्ष्मण नाईक, प्रेम, राजेश, शिवा, एक कानडी भाषिक व्यक्ती आणि पोलिसांच्या वेशातील दोन अनोळखी अशा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. नाईकवर यापूर्वी बनावट नोटा, चोरी, मारहाणीचे गुन्हे असून तो जामिनावर आहे. मिरज ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.
