जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात १६ नवीन वाहने दाखल ; पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात १६ नवीन वाहने दाखल ; पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात नव्याने १६ बोलेरो गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. तब्बल २ कोटी १५ लाख रुपये इतक्या खर्चातून शासनाच्या माध्यमातून ही वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
आषाढी एकादशीनिमित्त आज (रविवार) जळगाव शहरातील नवीन रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या इमारतीचे आणि या वाहनांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक तसेच जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते.
पोलीस दलाला बळकटी
या नव्या वाहनांच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागांतील गस्त, गुप्त तपास, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद आणि कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करण्याच्या कामात गती येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दल अधिक सज्ज होणार आहे.
पालकमंत्र्यांकडून शुभेच्छा व प्रेरणा
याप्रसंगी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस दलाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. शासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव कटिबद्ध असून पोलीस दलाच्या सुविधांमध्ये सातत्याने वाढ करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या वाहनांच्या मदतीने पोलीस यंत्रणा अधिक सक्षम होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पोलीस अधीक्षकांचे मनोगत
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या वाहनांच्या सहाय्याने पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ होईल असे सांगत, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी वाहनांची पूजा करण्यात आली. पालकमंत्र्यांच्या हस्ते वाहनांच्या चाव्या अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आल्या. नव्या गाड्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना त्यांची गरजेनुसार ही वाहने वितरित करण्यात येणार आहेत.