सोन्याच्या दरात पुन्हा उसळी! लग्नसराईनंतरही जीएसटीसह सोन्याचा दर पुन्हा एक लाखाच्या पलीकडे ; जाणकार म्हणतात, “खरेदीसाठी योग्य संधी”

सोन्याच्या दरात पुन्हा उसळी! लग्नसराईनंतरही जीएसटीसह सोन्याचा दर पुन्हा एक लाखाच्या पलीकडे ; जाणकार म्हणतात, “खरेदीसाठी योग्य संधी”
जळगाव: शहरातील सुवर्णपेठेत एक दिवसाच्या घसरणीनंतर पुन्हा एकदा सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी सोने प्रति तोळा तब्बल ४०० रुपयांनी वधारले असून, जीएसटीसह सोन्याचा दर पुन्हा एक लाखाच्या पलीकडे पोहोचला आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात ४०० रुपयांची घसरण झाली होती. मात्र लगेचच मंगळवारी त्यात तितकीच वाढ झाल्याने सध्या सोन्याचा दर प्रतितोळा ९७,५०० रुपये, तर जीएसटीसह १,००,४२५ रुपये इतका झाला आहे. चांदी मात्र मागील काही दिवसांपासून स्थिर असून, प्रति किलो १,११,२४० रुपये इतकी आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर ट्रम्प सरकारच्या नव्या टेरिफ धोरणामुळे सोने बाजार अस्थिर झाला आहे. १ ऑगस्टपूर्वी १४ देशांवर नव्याने लादलेल्या टेरिफमुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून, त्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे. महागाईची भीती आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहू लागले आहेत.
दुसरीकडे, लग्नसराई संपल्याने स्थानिक बाजारात ग्राहकांची गर्दी काहीशी कमी झाली असली, तरीही जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारातील अभ्यासकांचे म्हणणे आहे की, “सध्या जागतिक अनिश्चिततेमुळे सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी सोने खरेदीची ही योग्य वेळ आहे.”





