
सावदा l शेख मुख्तार l ०४ जुलै २०२५ l एरव्ही साखरपुडा आणि लग्नाची तारीख ठरवण्यासाठी होणारा अनावश्यक खर्च टाळून, अत्यंत साधेपणाने आणि मुस्लिम रितीरिवाजानुसार एका विवाह सोहळ्याचे आयोजन सावदा येथील ख्वाजा नगर येथे करण्यात आले. विशेष म्हणजे, लग्नाची तारीख निश्चित करण्यासाठी जमलेल्या दोन्ही कुटुंबांनी माजी नगरसेवक अल्लाबक्ष उर्फ गुड्डू मेंबर यांच्या विनंतीला मान देऊन त्याच दिवशी विवाह पार पाडला, ज्यामुळे समाजाला एक आदर्श संदेश मिळाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक ३० जून २०२५ रोजी भुसावळ येथील सय्यद वजीर यांचा मुलगा सय्यद शोएब आणि सावदा येथील शेख इस्माईल शेख लाल यांची कन्या शाहिन बी यांच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी दोन्हीकडील मंडळी ख्वाजा नगर येथे एकत्र जमली होती.
यावेळी उपस्थित असलेले माजी नगरसेवक अल्लाबक्ष उर्फ गुड्डू मेंबर यांनी दोन्ही कुटुंबांना एक महत्त्वाचा विचार दिला. त्यांनी सांगितले की, आजच्या महागाईच्या काळात वेळोवेळी जमून साखरपुडा आणि लग्नाची तारीख निश्चित करण्याच्या अनावश्यक खर्चाऐवजी, इस्लाम धर्माचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांनी दिलेल्या शिकवणीनुसार साध्या पद्धतीने, केवळ चहा-पाणी किंवा सरबतावर लग्न करणे अधिक श्रेयस्कर आहे.
गु्ड्डू मेंबर यांच्या या दूरदृष्टीच्या विचाराला दोन्ही कुटुंबांनी आणि उपस्थित सर्व लोकांनी सहमती दर्शवली. त्यानंतर, लग्नाची तारीख घेण्यासाठी आलेल्या मंडळींनी त्याच क्षणी लग्न लावण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर, वधू-वरांचे अत्यंत साध्या पद्धतीने, मुस्लिम रितीरिवाजानुसार लग्न लावण्यात आले.
या आदर्श विवाह सोहळ्यामुळे सावदा येथील सर्व जाती-धर्माच्या लोकांमध्ये कौतुकाचा विषय बनला आहे. अनावश्यक खर्च टाळून साधेपणाने लग्न करण्याच्या या घटनेने समाजाला एक नवी प्रेरणा मिळाली आहे.
या लग्न सोहळ्यासाठी शेख अल्लाबक्ष उर्फ गुड्डू मेंबर यांच्यासोबतच शेख खालील शेख लाल, शेख अदनान, शेख हुमायू, शेख शरीफ, शेख जमील, शेख अनीस आणि शेख तौफिक यांनी विशेष प्रयत्न केले.