ज्येष्ठ विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभा खासदारपदी नियुक्ती

ज्येष्ठ विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभा खासदारपदी नियुक्ती
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी चार नव्या सदस्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये ज्येष्ठ विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, केरळमधील सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्ते, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि इतिहासकार मीनाक्षी जैन यांचा समावेश आहे.
राज्यसभेची एकूण सदस्य संख्या २५० असून त्यापैकी २३८ सदस्य हे विविध राज्यांतून निवडून येतात, तर उर्वरित १२ सदस्य राष्ट्रपतींकडून विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींपैकी नामनिर्देशित केले जातात. या चौघांचे नामांकन हे पूर्वीच्या नामनिर्देशित सदस्यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या जागांवर करण्यात आले आहे. ही नेमणूक भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ८०(१)(अ) आणि उप-कलम (३) अन्वये करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, उज्वल निकम यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी पराभूत केले होते. त्यानंतर आता त्यांना राज्यसभेवर नामनिर्देशित करून केंद्र सरकारने त्यांचा सन्मान केला आहे.
उज्ज्वल निकम हे अनेक गाजलेल्या आणि संवेदनशील खटल्यांचे विशेष सरकारी वकील राहिले आहेत. त्यांचे कायदाक्षेत्रातील योगदान व्यापक असून ते देशभरात ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत.
