चोपडा तालुक्यात २ लाख ६२ हजारांचा गांजा जप्त; दोन तरुण अटकेत

चोपडा तालुक्यात २ लाख ६२ हजारांचा गांजा जप्त; दोन तरुण अटकेत
जळगाव चोपडा तालुक्यातील गलंगी गावापासून चोपडा शहरापर्यंत पाठलाग करत एलसीबी पथकाने गांजाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोघा तरुणांना अटक केली. या कारवाईत २ लाख ६२ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.
२० जुलै रोजी रात्री ८.३० वाजता पोहवा रवींद्र पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, काळ्या रंगाच्या बजाज पल्सरवरून (एमएच १८ बीडब्ल्यू ८०३५) दोन तरुण गलंगी गावातून चोपडा शहराकडे गांजाची वाहतूक करत होते.
पोलिसांनी तात्काळ गलंगी येथे पाळत ठेवत आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी वेगाने चोपडा शहराकडे पळाले. त्यांचा पाठलाग करून पोउपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांच्या नेतृत्वाखाली शहरात नाकाबंदी करण्यात आली. मोटारसायकलवर मागे बसलेला एक आरोपी उडी मारून पळण्याचा प्रयत्न करत होता; परंतु पोलीस उपनिरीक्षक वल्टे यांनी सुमारे १५० मीटर धावत जाऊन त्याला पकडले.
या कारवाईत ८.१३० किलो गांजा (किंमत १.२१ लाख), दुचाकी (९० हजार) आणि दोन मोबाईल्स (५१ हजार) असा एकूण २.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक आरोपींमध्ये उदयभान संजय पाटील (२१, रा. चांग्या निमजवळ, अडावद) आणि योगेश रामचंद्र महाजन (२१, रा. खालचा माळीवाडा, अडावद) यांचा समावेश आहे. त्यांच्या विरोधात चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पो.नि. मधुकर साळवे, पोउ.नि. जितेंद्र वल्टे व त्यांच्या पथकाने केली.
