सागर पार्कजवळ इमारतीचे अनधिकृत बांधकाम, मोठ्या अधिकाऱ्याची भागीदारी
खान्देश टाइम्स न्यूज | ७ ऑगस्ट २०२३ | जळगाव शहरात अनेक अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरू असून नियम धाब्यावर बसवून बांधकाम केले जात आहे. सागर पार्क मैदानाजवळ अशाच एका इमारतीचे काम सुरू असून त्यात एका मोठ्या अधिकाऱ्याची भागीदारी असल्याची जोरदार चर्चा आहे.
जळगावात अनेक मोठमोठ्या इमारती उभारल्या जात असून उर्वरित परिसरात भव्य प्रकल्प उभारले जात आहे. शहरातील सागर पार्क मैदानाजवळ अशाच एक भव्य इमारतीचे बांधकाम सुरू आहे. चर्चेनुसार इमारतीचे बाजारमूल्य जागेसह १६ कोटी असल्याचे सांगितले जात आहे. नवीन नियमानुसार कोणताही प्रकल्प रेरा नोंदणी करणे, नियमानुसार वाहनतळ व इतर हवेशीर वातावरणासाठी पुरेशी जागा सोडणे बंधनकारक आहे. मात्र त्या इमारतीच्या बाबतीत तसे काहीही झालेले नसल्याची माहिती समोर येत आहे.
चर्चेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याची प्रकल्पात छुपी भागीदारी आहे. मोठा अधिकारी असल्याने कुणीही सध्या त्यावर बोलायला तयार नसून काही माहिती अधिकार कार्यकर्ते याविषयी अर्ज देखील करणार आहेत. आव्हाणे रस्त्यावरील अशाच एका प्रकल्पातील त्रुटींचा अंदाज घेऊन काही महाशयांनी तोडपानी करण्याचा प्रयत्न देखील केला होता. खान्देश टाइम्स न्यूजच्या वृत्तानंतर तो व्यवहार फिसकटला असला तरी खान्देश टाइम्स प्रतिनिधींनी मालमत्ता धारकांच्या हक्कासाठी तक्रार करण्याची तयारी ठेवली आहे.