राज्यपालांनी केली शिफारस, निवडीचे पत्र प्राप्त
जळगाव l ८ ऑगस्ट २०२३ l राज्याचे राज्यपाल तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती यांनी राज्यभरातील एकूण ६ जणांची अधिसभेच्या (सिनेट) सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. यात जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश विठ्ठलराव ठाकूर यांचीदेखील अधिसभा (सिनेट) सदस्यपदी निवड झाली आहे. याबाबतचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे जळगाव जीएमसीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
डॉ. गिरीश ठाकूर यांनी अंबेजोगाईचे स्वामी रामानंदतीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथून कान-नाक-घसा शास्त्र विषयातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तर त्यांनी नंदुरबार, लातूर, रायगडनंतर जळगाव येथे अधिष्ठातापदाची धुरा सांभाळली आहे. उत्कृष्ट प्रशासक, शिस्तबद्ध कारभार करण्यासाठी म्हणून ते ओळखले जातात.
जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. गिरीश ठाकूर यांची २८ नोव्हेंबर २०२२ रोजी नियुक्ती झाली होती. गेल्या ८ महिन्यांपासून ते यशस्वीपणे जळगाव जीएमसीचा कारभार पाहत आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त सहा सदस्यांमध्ये जळगावचे डॉ. गिरीश ठाकूर यांच्याशिवाय पुणे येथील डॉ. पराग संचेती, डॉ. हेमलता जळगावकर, नाशिक येथील डॉ. चेतना गोरीवाले, डॉ. मीनल मोहगावकर, डॉ. अभय कुलकर्णी यांचा समावेश आहे.