
जळगावात दुचाकी चोरीचा छडा; भुसावळमधील आरोपीला अटक
जळगाव: शहरातील शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी चोरीस गेलेली बजाज पल्सर मोटारसायकल भुसावळ येथील आरोपीकडून जप्त केली आहे.
१४ ऑगस्ट रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. एका अज्ञात चोरट्याने फिर्यादीची बजाज पल्सर दुचाकी चोरून नेली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रदीप नन्नवरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता.
गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ शशिकांत पाटील, पोलीस अंमलदार निलेश घुगे, रवींद्र तायडे, पराग दुसाने, अमोल वंजारी आणि गणेश ढाकणे यांनी वेगाने तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, संशयित आरोपी भुसावळ येथील पापानगर, ईराणी मोहल्ला येथे राहत असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर, तपास पथकाने बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रवी नेरकर, पोलीस अंमलदार प्रशांत सोनार आणि सचिन चौधरी यांच्या मदतीने सापळा रचला. पोलिसांनी हसन अली उर्फ हशू नियाज अली (वय २३, रा. पापानगर, भुसावळ) या संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीला गेलेली बजाज पल्सर मोटारसायकल हस्तगत करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.





