
चाळीसगाव: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात मंगळवारी रात्री भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
हल्ल्याचा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी साडी सेंटरजवळ काही अज्ञात हल्लेखोरांनी प्रभाकर चौधरी यांना अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्राने (कोयत्याने) वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे चौधरी यांना जबर मार लागून प्रचंड रक्तस्राव झाला. घटनेची माहिती मिळताच त्यांना तात्काळ उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले.
राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत
प्रभाकर चौधरी हे भाजपचे एक सक्रिय कार्यकर्ते आहेत. दोनच दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर लगेचच हा हल्ला झाल्यामुळे यामागे राजकीय वैमनस्य असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली आहेत. या हल्ल्यामागे राजकीय वाद आहे की वैयक्तिक वैर, याचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, या हल्ल्याचा भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदवला असून, यामुळे चाळीसगावातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे





