
चाळीसगावात बांधकाम कंपन्यांची ४५ लाखांची रोकड व कागदपत्रे लंपास
चाळीसगाव प्रतिनिधि येथील शिवनेरी प्रकल्पाचे काम करणाऱ्या सुपरिअल्टी बिल्टकॉन एलएलपी, मुंबई व लक्ष्मी वरद इन्फ्रा. प्रा. लि. या कंपन्यांचे तब्बल ४५ लाखांची रोकड, हार्डडिस्क आणि पेन ड्राईव्ह असा एकूण ४५ लाख १६ हजार ३०० रुपयांचा ऐवज छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयातून चोरीला गेला आहे. याप्रकरणी प्रकल्प संचालकांच्या फिर्यादीवरून सुनील उर्फ साईनाथ पंढरीनाथ चौधरी (रा. चाळीसगाव) याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवनेरी पार्क हा पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी गृहप्रकल्प असून त्याची कामे संबंधित कंपन्या करीत आहेत. दैनंदिन खर्च, मजुरांचे पगार तसेच ठेकेदाराने सुरक्षेसाठी जमा केलेली रक्कम मिळून सुमारे ४२ लाख रुपये ३० ऑगस्ट रोजी कंपनीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयात ठेवण्यात आले होते. यासोबतच काही कागदपत्रे, १६ हजारांची हार्डडिस्क व ३०० रुपयांचा पेन ड्राईव्ह देखील कपाटात ठेवण्यात आले होते.
दरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी कार्यालयात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सकाळी ७.२६ वाजता एक तरुण वॉचमनकडून चावी घेत कार्यालयात शिरताना दिसून आला. त्याने पिशवी व गोणीत भरून कपाटातील रोकड आणि साहित्य लंपास केल्याचे आढळले.
तपासात हा तरुण साईनाथ चौधरी असल्याचे स्पष्ट झाले. चौधरीला याआधी कंपनीतून कामावरून काढण्यात आले होते. त्याने वॉचमनला खोटे सांगून चावी मिळवली आणि चोरी केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा तपास चाळीसगाव शहर पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे बांधकाम व्यावसायिक व प्रकल्पातील मजुरांमध्ये खळबळ उडाली आहे.





