
जळगाव पोलीस दलाकडून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ बाईक रॅलीचे आयोजन
जळगाव – ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या राष्ट्रीय मोहिमेच्या दहा वर्षपूर्तीच्या निमित्ताने जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी (दि. ६ मार्च २०२५) सकाळी ९:०० वाजता पोलीस मुख्यालयातून या रॅलीला सुरुवात झाली. या उपक्रमात जिल्ह्यातील १०५ महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या बाईक रॅलीला पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी हिरवा झेंडा दाखवत प्रारंभ केला. रॅलीदरम्यान पोलीस दलाकडून नागरिकांना ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चा संदेश देण्यात आला. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत तसेच जळगाव उपविभागातील सर्व प्रभारी अधिकारी आणि महिला पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे समाजात मुलींच्या शिक्षणाबाबत जनजागृती होईल, तसेच महिलांच्या सुरक्षेविषयी पोलीस दलाचा कटाक्ष स्पष्ट होईल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. जळगाव जिल्हा पोलीस दलाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.