
घरफोडी : गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यास गेलेल्या कुटुंबियांचे घर फोडले ; ५ तोळे सोन्याचे दागिने लंपास
चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
जळगाव प्रतिनिधी : जळगाव शहरातील नारायण पार्क परिसरातील श्री अपार्टमेंट येथे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान घरफोडीची धक्कादायक घटना घडली आहे. गणेश विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात दोन चोरट्यांनी ५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना ६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. चोरटे अपार्टमेंट परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
नारायण पार्क परिसरातील श्री अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रुचिता पवार या आपल्या कुटुंबियांसह ६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजल्यापासून गणेश विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. रात्री १० वाजता घरी परतल्यानंतर त्यांना घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले आढळले. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना कपाट तोडलेले आणि त्यातील ५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे दिसून आले. चोरट्यांनी घरातील इतर सामान पलंगावर अस्ताव्यस्त केले होते, परंतु रोख रकमेला हात लावला नाही. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अपार्टमेंट परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन भामटे दुचाकीवरून येताना आणि चोरी करून पळून जाताना कैद झाले आहेत. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.





