त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याचा ओरिजनल पत्रकार संघाकडून तीव्र निषेध; कठोर कारवाईची मागणी

त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याचा ओरिजनल पत्रकार संघाकडून तीव्र निषेध; कठोर कारवाईची मागणी
सावदा,: त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर स्थानिक गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा ओरिजनल पत्रकार संघ, सावदा यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणी फैजपूर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, हल्लेखोर गुंडांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी. तसेच, प्रवेशकर वसुली करणाऱ्या ‘ए. एस. मल्टी सर्व्हिसेस’ या कंपनीच्या मालकाविरुद्धही गुन्हा नोंदवून कंपनीला काळ्या यादीत टाकावे आणि महाराष्ट्रात कोणताही ठेका देऊ नये, अशी मागणी संघाने केली आहे.
पत्रकारांनी निदर्शनास आणले की, नोव्हेंबर २०१९ मध्ये पत्रकार संरक्षण कायदा लागू झाल्यानंतरही राज्यभरात ३०० हून अधिक पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. मात्र, यापैकी केवळ ४३ प्रकरणांमध्येच या कायद्याचा वापर झाला आहे. शासनाकडून या कायद्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे यावरून स्पष्ट होते. यामुळे गृहमंत्रालयाने पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत प्रकरणांच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी आणि प्रलंबित प्रकरणांची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी नायब तहसीलदार जगदीश गुरव यांच्याकडे निवेदन सादर केले
ओरिजनल पत्रकार संघाचे अध्यक्ष भानुदास सखाराम भारंबे, उपाध्यक्ष दिलीप रामभाऊ चांदेलकर, कार्याध्यक्ष युसूफ शहा सुपडू शाह, सचिव शेख फरीद शेख निरोद्दीन, खजिनदार कैलास भाऊलाल लवंगडे, प्रसिद्धी प्रमुख अजहर खान अजमल खान, शेख मुक्तार शेख अरमान, दीपक रमेश श्रावगे, प्रशांत धोंडू सरवदे आदी उपस्थित होते.
पत्रकार हल्ल्याच्या घटना आणि कायद्याची अंमलबजावणी:
पत्रकारांवरील हल्ल्यांच्या वाढत्या घटना लक्षात घेता, शासनाने पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. स्वतंत्र चौकशी समितीच्या स्थापनेमुळे पत्रकारांना संरक्षण मिळण्यास मदत होईल आणि अशा घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षा पत्रकार संघाने व्यक्त केली आहे




