खान्देशजळगांव

जिल्हाधिकारी कार्यालयावर सरन्यायाधीश गवई यांच्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा

जिल्हाधिकारी कार्यालयावर सरन्यायाधीश गवई यांच्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा

जळगाव प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर कोर्टात बूट फेकणाऱ्या अॅड. राकेश तिवारी याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जळगावात संविधान प्रेमी नागरिक, सामाजिक संघटना आणि बहुजन समाज घटकांनी एकत्र येत तीव्र आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला .

आंदोलकांनी हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून संविधान, लोकशाही आणि न्यायव्यवस्थेवरचा थेट हल्ला असल्याचे सांगत तीव्र निषेध व्यक्त केला. आकाशवाणी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या मोर्चात बहुजन क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, परीट समाज, चर्मकार समाज, आंबेडकर समाज, मेहतर-वाल्मिकी समाज आदी संघटनांचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

रस्त्यांवर “संविधान बचाव”च्या घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. राकेश तिवारीच्या प्रतिमेला पादत्राण्यांनी चोप देत त्याचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांना निवेदन सादर करत राकेश तिवारीवर देशद्रोह, जातीय तेढ पसरविणे आणि न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

आंदोलनात मुकुंद सपकाळे, सुरेंद्र पाटील, डॉ. करीम सालार, सागर सबके, सुरेश चांगरे, शैलेश सोनवणे, जयसिंग वाघ यांच्यासह अनेक नागरिकांचा सहभाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button