खान्देशगुन्हेजळगांव

तीन पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकणारे पाच सराईत गुन्हेगार जेरबंद

तीन पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकणारे पाच सराईत गुन्हेगार जेरबंद

रोकड, तीन गावठी पिस्तुले, पाच मॅगझिन, नऊ मोबाईल जप्त ; एलसीबीची कारवाई

प्रतिनिधी | मुक्ताईनगर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर झालेल्या सशस्त्र दरोड्याचा अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. तब्बल चार दिवसांच्या अतिशय काटेकोर तपासानंतर पोलिसांनी या प्रकरणात भुसावळ आणि अकोला तालुक्यातील पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली असून एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

दरोड्यानंतर सलग तीन पेट्रोल पंप लुटले

९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मुक्ताईनगर येथील रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर दरोडा घालण्यात आला होता. त्यानंतर या टोळीने सलग दोन अन्य ठिकाणी कर्की फाटा (ता. मुक्ताईनगर) येथील मनुभाई आशीर्वाद पेट्रोल पंप आणि वरणगाव शिवारातील सैय्यद पेट्रोल पंप येथेही दरोडे घालत सीसीटीव्ही कॅमेरे फोडले, डीव्हीआर चोरी केला आणि एकूण तब्बल १ लाख ३३ हजार रुपयांची रोकड लुटून फरार झाले.

यात सहभागी असलेले सचिन अरविंद भालेराव (३५, भुसावळ, मूळ रा. खकनार, जि. बुर्‍हाणपूर, म.प्र.) , पंकज मोहन गायकवाड (२३, वेडीमाता मंदिर, जुना सातारा रोड, भुसावळ) , हर्षल अनिल बावस्कर (२१, बाळापूर, जि. अकोला),देवेंद्र अनिल बावस्कर (२३, बाळापूर, जि. अकोला),प्रदुम्न दिनेश विरघट (१९, श्रद्धा नगर, कौलखेड, अकोला),तसेच एका अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपींकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ४० हजार रुपयांची रोकड, तीन गावठी पिस्तुले, पाच मॅगझिन, नऊ मोबाईल फोन आणि निळ्या रंगाची सॅक बॅग असा मोठा शस्त्रसाठा व माल जप्त केला आहे.

जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि भुसावळचे उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे, शेखर डोमाळे, जितेंद्र वल्टे आणि ग्रेडेड पीएसआय रवी नरवाडे यांनी सक्रिय भूमिका बजावली. पोलिसांनी चार आरोपींना नाशिकमधून तर एक आरोपी व त्याचा अल्पवयीन साथीदार अकोल्यातून अटक केली.

अटकेतील मुख्य आरोपी सचिन भालेराव हा भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यातील खुनाचा प्रयत्न आणि दंगा करणे या गंभीर गुन्ह्यांमध्ये पूर्वीच आरोपी आहे. विशेष म्हणजे २०२४ मध्ये महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार त्याला जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. तरीही तो परत येऊन गुन्हेगारीकडे वळल्याचे तपासात समोर आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button