
बीड पॅटर्नची पुनरावृत्ती जळगावात? भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी वकील आणि जागामालकांवर कारवाईची मागणी
जळगाव: बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात बनावट आदेशाद्वारे ७२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना अटक झाल्यानंतर आता जळगाव महानगरपालिकेतील भूसंपादन प्रकरणांकडे सर्वांच्या नजरा वळल्या आहेत. जळगावातही विकासकामांच्या नावाखाली जमिनींचा मोबदला मिळवताना कोट्यवधींचा फुगवटा केल्याचा आरोप होत असून, यात मनपाचे अधिकारी, वकील आणि जागामालक यांच्या संगनमतातून ‘बीड पॅटर्न’ राबवला गेल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रस्ते आणि इतर प्रकल्पांसाठी संपादित जमिनींच्या मोबदल्यात मूळ बाजारभावापेक्षा अनेक पटींनी वाढीव रक्कम मागण्यात आली. “तुम्ही मारल्यासारखे करा, आम्ही रडल्यासारखे करू” या उक्तीप्रमाणे न्यायालयात मनपाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी आणि कायदे अधिकाऱ्यांनी सक्षम प्रतिवाद केला नसल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. आवश्यक पुरावे आणि तुलनात्मक दस्तऐवज सादर न केल्याने न्यायालयाकडून अवास्तव वाढीव रक्कम मंजूर झाली, ज्याचा मोठा आर्थिक बोजा मनपाच्या तिजोरीवर पडला आहे.
या संदर्भात जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. मनपातील भूसंपादन व्यवहारांची विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी विधानसभेतही लावून धरली आहे. संबंधित जागामालक, मनपा अधिकारी आणि कायदे सल्लागारांवर गुन्हे दाखल करून शासनाचे झालेले नुकसान त्यांच्याकडूनच वसूल करावे, असे त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे.
बीड प्रकरणातील कारवाईनंतर जळगावातील या संशयास्पद व्यवहारांची सखोल चौकशी झाल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाविरोधात लवकरच जनहित याचिका दाखल करण्याची तयारी सुरू असून, जबाबदारी निश्चित करून संबंधित दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.





