
अमळनेरमध्ये मध्यरात्री पोलिसांचे ‘कोंबिंग ऑपरेशन’
गुटखा, गावठी दारू, गावठी कट्ट्यासह मोठी कारवाई; ७० संशयितांची तपासणी, १२ फरार आरोपी जेरबंद
अमळनेर | प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात मध्यरात्री व्यापक ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवून पोलिसांनी गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांविरोधात मोठी कारवाई केली. पहाटे २.३० ते सकाळी ७ वाजेपर्यंत अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या नेतृत्वाखाली पाच स्वतंत्र पथकांनी शहरातील विविध भागांमध्ये एकाचवेळी धाडसत्र राबविले. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
या मोहिमेसाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पाच दुय्यम अधिकारी, ४० पोलीस अंमलदार, उपविभागातील ३० कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेचे १० जवान आणि आरसीपीच्या तीन प्लाटूनचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सर्व पथकांना गुप्त सूचना देत विविध ठिकाणी एकाचवेळी छापेमारी करण्यात आली.
कारवाईदरम्यान शहरातील अवैध गुटखा साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. सिंधी कॉलनीतील सुगनोमल किशनचंद बठेजा आणि फरशी पूल परिसरातील आकाश बाबूलाल सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्या ताब्यातून सुमारे ५२ हजार ५०० रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि गुटखा जप्त करण्यात आला.
दारूबंदी कायद्यांतर्गतही पोलिसांनी मोठी मोहीम राबवत आठ वेगवेगळे गुन्हे दाखल केले. करत्तारसिंग तरशेमसिंग शिख, निशीकांत प्रभाकर शिरसाठ, कैलास अमृत भिल, राजेंद्र कांतीलाल शिंदे, सुलोचना भाईदास भिल, रुपा विक्की बाटुंगे, योगेश हरी भोई आणि आनंद ईश्वर सोनवणे यांच्यावर कारवाई करण्यात आली. या धाडीत १२ हजार लिटर कच्चे-पक्के रसायन आणि २ हजार ९५० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू असा एकूण ८ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.
संयुक्त कारवाईत अमळनेर आणि चोपडा पोलिसांनी गावठी कट्ट्याचा पर्दाफाश करत एक गावठी कट्टा, दोन मॅगझीन आणि दोन मोबाईल फोन जप्त केले. या प्रकरणी तीन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाने जारी केलेल्या सात पकड वॉरंटचीही प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. विशाल दशरथ चौधरी, महेंद्र संतोष भोई, राजेश ऊर्फ सोनल घोडेवाला यांच्यासह सात आरोपींना अटक करण्यात आली. तसेच अन्य नऊ जणांविरुद्धच्या जामीनपात्र वॉरंटचीही बजावणी करण्यात आली.
याशिवाय अमळनेर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील ११० संशयित आणि सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. त्यापैकी ७० जणांची चौकशी करून त्यांचे ‘इंटरोगेशन फॉर्म’ भरून घेण्यात आले. तसेच विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या १२ आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.
या व्यापक आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे अमळनेर शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून पोलिसांच्या धडक मोहिमेचे स्वागत करण्यात येत आहे.





