बहुचर्चित ऑडिओ क्लिप प्रकरणात विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

बहुचर्चित ऑडिओ क्लिप प्रकरणात विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात
अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत दोन गुन्हे; आज न्यायालयात हजर करण्याची शक्यता
नंदुरबार | प्रतिनिधी
राज्यभरात चर्चेत असलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात भाजपाचे तत्कालीन उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय वसंत चौधरी यांना नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने धुळे येथे ताब्यात घेतले आहे. जातीवाचक शिवीगाळ व अश्लील भाषेचा वापर केल्याचा आरोप असलेल्या या प्रकरणात त्यांच्या विरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत.
मागील महिनाभरात विजय चौधरी यांच्या मोबाईलवरील कथित संभाषणांच्या अनेक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यापैकी एका क्लिपमध्ये भाजपाच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबाबत जातीवाचक व शिवराळ भाषेचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी रोहन शरद गावित यांनी अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत तक्रार दाखल केली होती.
याशिवाय, शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेनेही दुसऱ्या कथित ऑडिओ क्लिपच्या संदर्भात विजय चौधरी यांच्याविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही गुन्हे दाखल झाल्यानंतर चौधरी जिल्ह्याबाहेर असल्याची माहिती होती.
गुरुवारी (६ ऑगस्ट) सायंकाळी धुळे-चाळीसगाव मार्गावर चौधरी हे त्यांच्या वाहनाने प्रवास करत असताना एलसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना नंदुरबार येथे आणण्यात आले असून वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना औपचारिक अटक करण्याची प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
चौधरी यांना आज (७ ऑगस्ट) न्यायालयात हजर करण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या कारवाईमुळे उत्तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून कथित ऑडिओ क्लिप प्रकरणातील पोलीस तपासातून आणखी कोणते तपशील समोर येतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.





