
जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव; एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक
पीएसआय दिनेश बडगुजर व एएसआय मुजफ्फरअली सैय्यद यांना राष्ट्रपती पदक; स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान
जळगाव | प्रतिनिधी
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच गुन्हेगारीविरोधात प्रभावी आणि धाडसी कारवाया करणाऱ्या जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात एकाच वेळी तीन मानाचे तुरा रोवले गेले आहेत. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना महाराष्ट्र शासनाकडून ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहे. तर पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फरअली जफरअली सैय्यद यांना गुणवत्तापूर्ण आणि उल्लेखनीय सेवेसाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने प्रतिष्ठित ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर झाले आहे.
स्वातंत्र्यदिनी होणार सन्मान
या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांचा १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात राज्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पदक प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे. या बहुमानामुळे जळगाव जिल्हा पोलीस दलात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एसपी धिवरे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था प्रभावीपणे राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, गंभीर गुन्ह्यांवर तातडीने कारवाई करणे तसेच पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना राज्य शासनाचे उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात विविध विशेष मोहिमा आणि गुन्हेगारीविरोधी कारवायांना गती मिळाली आहे.
बडगुजर, सैय्यद यांच्या सेवेलाही राष्ट्रपती पदक
पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फरअली जफरअली सैय्यद यांच्या प्रदीर्घ, कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तबद्ध सेवेची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. पोलीस दलातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मिळालेला हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान त्यांच्या सेवेला मिळालेली मोठी पावती मानली जात आहे.
जिल्हा पोलीस दलात उत्साहाचे वातावरण
एकाच वेळी जिल्हा पोलीस दलातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित सन्मान जाहीर झाल्याने जळगाव पोलिसांच्या कामगिरीला विशेष अधोरेखित झाले आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांच्या गौरवामुळे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या कार्याची सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे.




